श्री सिद्ध हनुमानजी महाराज’ जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन आजपासून
दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्ध हनुमानजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा भव्य सोहळा यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने मंदिर सेवा समितीच्या वतीने १ व २ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरूवात जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सामूहिक ‘सुंदरकांड’ पठण व ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवार, २ एप्रिल रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. पहाटे ५ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ८ वाजता चोला शृंगार व विशेष आरती, दुपारी १२ वाजता हवन पूजन, दुपारी ३ वाजता भजन कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वाजता महाआरती आणि सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्ध हनुमानजी महाराज मंदिर सेवा समिती, शास्त्री वॉर्ड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

