Mla badole : अर्जुनी मोरगावच्या आरोग्य यंत्रणेचा होणार कायापालट
आमदार बडोले यांच्या पाठपुराव्याला यश
नवेगावबांध (प्रतिनिधी) (Gondia) : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी राज्यस्तरीय आरोग्य विषयक समितीने नवेगावबांध येथे आढावा बैठक घेतली. आमदार राजकुमार बडोले यांनी विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांची दखल घेत प्रशासनाने या क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून, रिक्त पदे भरणे व आरोग्य केंद्रांच्या श्रेणीवर्धनाला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरातील डोर्मेटरी हॉलमध्ये पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होत आहे, ही बाब लक्षात घेऊन कंत्राटी पद्धतीने तात्काळ पदे भरून आरोग्य सेवा पूर्ववत करण्याचे निर्देश समितीने दिले. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व उपकेंद्रांचे श्रेणीवर्धन करून तिथे अद्ययावत सुविधा पुरवल्या जातील. ज्या ठिकाणी दवाखान्यांच्या इमारतींचा प्रश्न आहे किंवा जागा उपलब्ध नाही, तिथे जमिनीची मागणी करून तात्काळ नवीन इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्याचा आढावा घेण्यात आला. तसेच, कंत्राटी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडावीत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.या बैठकीला मुंबई येथील आरोग्य सेवा रुग्णालयाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, सहसंचालक (प्राथमिक) डॉ. सरिता हजारे, नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी आमदार राजकुमार बडोले यांच्यासह पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या सभापती आम्रपाली डोंगरवार, सडक अर्जुनीचे सभापती चेतन वडगाये, कृ.उ.बा.स. सभापती डॉ. अविनाश काशीवार, किशोर तरोणे, प्रकाश गहाणे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, योगेश नाकाडे, सुधाताई रहांगडाले, विलास बागडकर, रामदास बोरकर व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या मुंबई येथील अधिवेशनात आमदार बडोले यांनी आरोग्य विभागाच्या दुरवस्थेचा मुद्दा लावून धरला होता, ज्यावर सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आज या दुर्गम भागाचा दौरा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

