एमपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत आमगावच्या आशीष माहिरे यांचे यश
राज्यात २९ वा क्रमांक
आमगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल मोठ्या प्रमाणात आकर्षण वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत आमगाव येथील आशीष राहुलकुमार माहिरे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण महाराष्ट्रातून २९ वा क्रमांक मिळविला आहे.

आशीष माहिरे यांच्या या यशामुळे आमगाव शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. या यशाच्या जोरावर आशीष माहिरे यांची महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता (गट-अ) या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विभागात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आशीष माहिरे यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. त्यांच्या या यशामागे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांचे मार्गदर्शन व पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. आशीष माहिरे यांच्या या यशामुळे आमगाव परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी प्रेरणा मिळाली असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

