स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही गोवारीटोला अंधारातच!
३० वर्षांपासून विजेची प्रतीक्षा
दूषित पाणी आणि चिखलमय रस्त्यांनी नागरिक हैराण
सडक अर्जुनी (गोंदिया) : एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार ‘हर घर जल’ आणि ‘सौभाग्य’ सारख्या योजनांतून प्रत्येक घरापर्यंत वीज-पाणी पोहोचल्याचा दावा करत असताना, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घाटेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या टेंभनी (गोवारी टोला) येथील वास्तव अतिशय धक्कादायक आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजवर या गावाला ना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले, ना विजेचा उजेड. ३० वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच आपले दिवस काढत असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ‘विकास’ नेमका कुठे गेला, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. घाटेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत टेंभनी, गोवारी टोला १, २ आणि पांढरी टोली अशा चार टोळ्यांचा समावेश होतो. यापैकी गोवारी टोला हा सुमारे १०० घरांची वस्ती असलेला आणि ३०० लोकसंख्या असलेला गावठाण आहे. विशेष म्हणजे, मागील ३० वर्षांपूर्वी या गावात विद्युत खांब रोवण्यात आले होते, मात्र तीन दशके उलटूनही या खांबांवर अद्याप विजेचा दिवा प्रकाशलेला नाही. रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव काळोखात बुडालेले असते. पिण्याच्या पाण्याची सोय तर पूर्णपणे कोलमडली असून, गावात बसवण्यात आलेले सौर ऊर्जा पंप केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. हँडपंपमधून पिवळसर आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना शेत शिवारातील बोअर किंवा विहिरीतून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. रस्ते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत बोलायचे झाल्यास, गोवारी टोला ते घाटेगाव घोटी टी-पॉईंटपर्यंतचा ५०० मीटरचा रस्ता खडीकरणाच्या नावाखाली केवळ गिट्टी-मुरूम टाकून अर्धवट सोडण्यात आला आहे. रोलरने गुठाई न केल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी उखडून मोठे खड्डे पडले आहेत. इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणार्या चिमुकल्यांना दररोज दीड किलोमीटर पायपीट करत घाटेगावला शाळेत जावे लागते. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून कसरत करावी लागते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्या या गोवारी टोल्यावर केवळ एका समाजाची वस्ती असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे शासन प्रशासन स्वतःचीच पाठ थोपटून घेत असताना, गोवारी टोल्यातील हे वास्तव विकासाच्या दाव्यांची पोलखोल करत आहे.
द्ध०००००

