OBC reservation : जिल्ह्यात महाआक्रोशाचे पिवळे वादळ धडकले
ओबीसीच्या महाआक्रोश मोर्च्याने गोंदिया शहर दणाणले
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून (OBC reservation) मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाचा तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजबांधवांनी रविवारी (ता. २१) कुडवा नाका ते जयस्तंभ चौकापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात १० हजाराच्यावर ओबीसी युवक, महिला-पुरूष सहभागी झाले होते. जय ओबीसी, जय-जय ओबीसी, नवे पर्व- ओबीसी सर्व, आरक्षण आमच्या हक्काचा- नाही कुणाच्या बापाचा, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे- झालीच पाहिजे, अशा एक नव्हे अनेक घोषणांनी सकल ओबीसी समाजाने कुडवा नाका परिसर दणाणून सोडला. काही वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर आरक्षणासह (OBC reservation) आपल्या न्याय मागण्यांसाठी एकटवलेले ओबीसी समाजबांधव, महिला भगिनी जोरदार घोषणा देत दुपारी साडेबारानंतर जयस्तंभ चौकाच्या दिशेने निघाले. आपल्या हक्कासाठी भर उन्हात वयोवृद्ध नागरिकही आंदोलनातून मागे हटले नाही.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची (OBC reservation) संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी समाजबांधवांनी केली. जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठीही समाजबांधवांमध्ये तीव्र आक्रोश पहायला मिळाला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला असंविधानिक पद्धतीने ओबीसी प्रवर्गात आरक्षण (OBC reservation) देण्याच्या विरोधात आहोत, याची सरकारने काळजी घेत सदर निर्णय मागे घ्यावा, असा मागणीवजा इशारा सकल ओबीसी समाजाने मोर्चातून सरकारला दिला.

आंदोलकांच्या मागण्या
शासनाने तत्काळ जातीनिहाय जनगणना करावी, ५० टक्के आरक्षणाची (OBC reservation) मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे, शासनाने मराठा आंदोलकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ नये आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करावे, २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
१० ऑक्टोबरच्या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन
पावसातही मोर्चेकरी उत्साही गोंदियात पहिल्यांदाच १० हजाराच्यावर ओबीसींचे पिवळे वादळ रस्त्यावर
विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार,खासदार प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान, आमदार परिणय फुके ,आमदार विनोद अग्रवाल, आमदार इंजि. राजकुमार बडोले, माजी आमदार दिलीप बनसोड, गोपालदास अग्रवाल,. ओबीसी महामोर्चा संयोजक उमेश कोर्राम यांनीही हजेरी लावली.

