Deori News: भर ग्रामसभेतून सरपंचाचा काढता पाय
ग्राम पंचायत सुरतोली येथील प्रकार
सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोग निधीवर प्रश्नचिन्ह?
देवरी : तालुक्यातील सुरतोली येथील ग्राम पंचायतीत सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या हिशोबावरून चांगलेच वादळ उठले आहे. गावकरी व सुज्ञ नागरिकांकडून आक्षेप घेत सरपंचाला लेखाजोखा सादर करण्याची मागणी केली. परंतु, सरपंचाकडून टाळाटाळची भुमिक घेतली जात होती. दरम्यान २८ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत लेखाजोखा सादर करण्याच्या मागणीवरून एकच गदारोळ सुरू झाला. संतप्त नागरिकांनी मागणी रेटून धरल्याने सरपंचानी ग्रामसभा सुरू असतानाच काढतापाय घेतला. यामुळे सामान्य फंड आणि १५ व्या वित्त आयोग निधीत सर्व आलबेल आहे का? असा प्रश्न गावकर्यांकडून निर्माण केला जात आहे.

देवरी तालुक्यातील सुरतोली ग्राम पंचायतीत सामान्य फंड आणि १५ वा वित्त आयोग निधीतंर्गत प्राप्त निधी कोणत्या विकासकामांवर खर्च करण्यात आला. याचा सरपंचाने लेखाजोखा सादर करावा, अशी मागणी गावकर्यांनी लावून धरली आहे. गावकर्यांच्या मागणीने ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंचाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. माहिती देण्यास सरपंचाकडून सतत टाळाटाळ केली जात असल्याने गावात वातावरण तापले आहे. त्यातच २८ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपस्थित गावकर्यांनी निधीचा लेखाजोखा सादर करण्याची मागणी केली. तसेच नाली सफाई कामकाजाचे बिल, सीसीटीव्ही खरेदीचे बिल, सुशोभीकरणावर केलेला खर्च आदी मुद्दे उपस्थित करून माहिती विचारली. यावर दरम्यान टाळाटाळच्या भुमिका घेणार्या सरपंचाकडून यावेळीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे गावकरी संतापले आणि ग्रामसभेतील वातावरण तापले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरपंचांनी भर सभेतून काढतापाय घेत सभा अर्धवट सोडून निघून गेले. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. या प्रकाराने सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा उपयोग पारदर्शकपणे झाला का? अशी शंकापूर्ण चर्चा गावात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी सरपंचाच्या कृतीचा निषेध करून वागणुकीवर नाराजी दर्शविली आहे.
……………………….
माहिती लपविण्यासाठी उद्देश काय?
पंचायत राज व्यवस्थेत ग्राम पंचायतीला महत्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. त्यातील ग्रामसभा हे ग्राम पंचायतीचा आत्मा आहे. गावातील कारभार पारदर्शक होवून गावकर्यांचा सहभाग वाढावा, यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. परंतु, याच ग्रामसभेत प्रमुख पदावर असलेला पुढारी गावकर्यांची अवहेलना करीत असेल तर ग्रामसभेचे महत्व काय? असा प्रश्न सुरतोली वासीयांनी उपस्थित केला आहे. सामान्य फंड आणि १५ व्या वित्त आयोग निधीत कोणत्याही प्रकाराचा गैरव्यवहार झाला नाही तर माहिती देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केला जात आहे.
००००००००००

