dumping yard : डम्पिंग यार्डप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार कारवाई?
शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात
गोंदिया : शहरातील मोक्षधाम परिसरातील डम्पिंग यार्डमधील (dumping yard) केरकचर्याला आग लावली जात असल्याने त्यातील निघणार्या विषारी धुरामुळे गणेशनगर, सेल्स टॅक्स कॉलनीसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारात गेल्या आठवडाभरात वाढ झाल्याने नागरिकांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली.
दरम्यान भंडारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेतली असून याप्रकरणी माहिती घेऊन नगरपरिषदेवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातून दररोज ३० ते ४० टन केरकचरा निघतो. हा कचरा नगरपरिषदेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलित केला जातो. यानंतर हा कचरा शहरालगतच्या मोक्षधाम परिसरत साठविला जातो. तेथून तो कंत्राटदाराच्या माध्यमातून ट्रकद्वारे हिरडामाली येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. मात्र, बरेचदा हा कचरा मोक्षधाम परिसरात आठ-आठ दिवस तसाच पडून राहतो. तर पूर्ण केरकचर्याची कधीच उचल नाही. त्यामुळे या ठिकाणी कचरा पडून राहतो. या कचर्याला मागील आठवडाभरापासून सातत्याने आग लावली जात आहे. (dumping yard) परिणामी या कचर्यातील विषारी घटकांचा धूर यालगत असल्याने गणेशनगर, सेल टॅक्स कॉलनीसह इतर भागांत जात असल्याने येथील नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. तसेच या परिसरात दिवसभर धुराचे साम्राज्य असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्तमानपत्रात यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर भंडारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी याची दखल घेत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मोक्षधाम परिसरातील केरकचरा त्वरित उचला
शहरातील मोक्षधाम परिसरात नगरपरिषदेने कचरा टाकणे त्वरित बंद करावे, तसेच येथे पडून असलेल्या केरकचर्याचे ढिगारे त्वरित उचलण्यात यावेत, नागरी वस्तीलगत केरकचरा टाकणार्या नगरपरिषदेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुशल अग्रवाल, विजय अग्रवाल, प्रशांत ठवकर, कृणाल राणे, शुभ नायक, नंदू व्यास, राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

