krushi license banned : 6 परवाने निलंबित व 3 परवाने रद्द
कृषि विभागाची धडक कारवाई
गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने खतांची उपलब्धता व विक्री तसेच दर्जा इत्यादी संनियंत्रणाच्या अनुषंगाने 8 निरीक्षक 1 भरारी पथकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना MRP दराने खत उपलब्ध होण्यासाठी व अनावश्यक निविष्ठांची लिंकींग न होण्याच्या उद्देशाने 2 ऑगस्ट 2025 पासून मोहिम स्वरुपात जिल्ह्यातील कृषि निविष्ठा धारकांच्या तपासण्या करण्यात आल्या. ई-पॉस मशिनवरुन खत विक्री करणे अनिवार्य असतांना ई-पॉस वरील साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये अनेक ठिकाणी 5 मे. टनापासून ते 60 मे. टन एवढी तफावत आढळुन आल्याने तसेच परवान्याच्या अनुषंगाने इतर अनियमितता जसे- साठा पुस्तक अद्यावत नसणे, विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे इत्यादी कारणासाठी 14 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीमध्ये 6 कृषि निविष्ठाचे परवाने निलंबित करण्यात आले तसेच 3 कृषि निविष्ठा धारकांचे परवाने रद्द करण्यात आले. यामध्ये गोंदिया-2, गोरेगाव-2, तिरोडा-1 व सालेकसा-4 असे एकूण 9 कृषि निविष्ठा परवाने समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी दिली.कृषि सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी केली अथवा जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. जिल्ह्यात युरिया, डीएपी व 20:20:0:13 या खतांचा MRP पेक्षा जादा दराने विक्री व लिंकींग होत असल्यासंदर्भात कृषि विभागाच्या 7499251343 या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याबाबत सुविधा उपलब्ध असून Whatsapp द्वारे देखील तक्रार नोंदवणे शक्य आहे.शेतकरी बांधवांनी MRP पेक्षा जादा दराने विक्री व लिंकींग बाबत सदर क्रमांकावर किंवा कृषि अधिकारी (गुण नियंत्रण), संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे लेखी तक्रार करावी. त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955, किटकनाशक कायदा 1968, किटकनाशक नियम 1971 नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल.शेतकऱ्यांनी खते खरेदी करतांना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. आपण खरेदी केलेली बॅग संख्या व ई-पॉस वर खतवलेली बॅग संख्या पडताळुन पहावी. तसेच पक्के बिल व ई-पॉस ची स्लीप ताब्यात घेऊनच दुकानातून बाहेर पडावे. तालुका निहाय/विक्रेते निहाय खताची उपलब्धता बघण्यासाठी https://fertilizerstockgondia.blogspot.com/ या लिंकवर जावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.

