Minister Sanjay Savkare; क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी निधी देणार
सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल ग्रास फुटबॉल मैदाना बांधकामाचे भूमिपूजन
भंडारा :- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू भंडारा जिल्हयातून पुढे यावेत. गुणवंत खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल,असे आश्वस्त उदगार पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी आज क्रिडा संकुलाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
भंडारा जिल्ह्यात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल ग्रास फुटबॉल मैदाना बांधकामाचे भूमिपूजन सोहळा आज शिवाजी क्रीडा संकुलात पार पडला .यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर,आमदार राजू कारेमोरे,आमदार परिणय फुके ,जिल्हाधिकारी सावनकुमार ,जिल्हा क्रीडा अधिकारी लतीका लेकुरवाळे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. १५००.०० लक्ष असून याव्दारे क्रीडा संकुलात आधुनिक सुविधा उपलब्ध होतील,असे श्री.सावकारे उपस्थित होते.
आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी खेळांडुच्या निवासस्थानातील शासकीय कार्यालय अन्यत्र स्थलांतरीत करण्याची मागणी केली.तर आमदार परिणय फुके यांनी भंडारा येथे बुध्दीबळ अकादमी सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली.क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी उपलब्ध करून देतील,असे ही श्री.फुके यांनी आश्वस्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लतीका लेकुरवाळे,सुत्रसंचालन प्रा.जयश्री सातोकर तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी श्री.नाकट यांनी मानले.

