शेतकर्यांसाठी जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
भंडारा, : शेतकर्यांसाठी फवारणी करताना काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रथाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भंडारा जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे, नूतन जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती संगीता माने, कृषी विकास अधिकारी विकास सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पत्रीकर, तालुका कृषी अधिकारी साकोली आदित्य घोगरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत पटवारी तसेच नागार्जुन कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अरविंद नागरे उपस्थित होते.
कृषी विभाग व नागार्जुन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीवेळी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी काही फवारणी किटचे वाटपही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी, मान्यताप्राप्त औषधे वापरावीत, खरेदीची पावती जतन करावी, कालबाह्य औषधे घेऊ नयेत, तसेच फवारणी करताना प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. याशिवाय, पर्यावरणपूरक कीटकनाशकांचा वापर आणि पंपाची योग्य स्वच्छता करण्यावरही भर देण्यात आला.
………………………………………..
जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे प्रकाशन
भंडारा : जिल्हा माहिती कार्यालय,भंडाराच्या वतीने प्रकाशित छोटया पर्यटनस्थळांची माहिती असणा-या छोटया पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी सावनकुमार,पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

