Gondia News; विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण द्यावे : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा
गोंदिया : आजचे विद्यार्थी हे उद्याचे भवितव्य असल्यामुळे शिक्षकाची भूमिका अतिशय मोलाची आहे. शिक्षणामुळे मानवाची प्रगती होत असते, त्यामुळे सर्व शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आज (ता.6) जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, सहायक उपसंचालक दिपेंद्र लोखंडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सुरक्षीत आणि सुसज्ज शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शासन तितक्याच गांभीर्याने काम करीत असून शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक शाळांमध्ये शुध्द पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, सुरक्षीत कम्पाउंड व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध स्त्रोतांतील निधीचा योग्य उपयोग केला जाणार आहे. डीपीडीसी निधी तसेच CSR फंड (कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी) च्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उभारल्या जातील असे ते म्हणाले.
नवीन शाळा इमारतीचे बांधकाम, जुन्या इमारतीचे दुरुस्तीकरण, संगणक कक्ष, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक साधनांची उपलब्धता ही शासनाची प्राथमिकता आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुध्दा समान सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजनबध्द पध्दतीने काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
बालकांचा सर्वांगीण विकास हा आमचा उद्देश आहे. शिक्षणात गुणवत्ता तर हवीच, पण त्यासाठी आवश्यक सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून ती पूर्णत्वास नेण्यासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या काळात गोंदिया जिल्ह्याला राज्य पातळीवर वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान देण्यात येईल असे ते म्हणाले. राज्यात एकीकडे जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. परंतू गोंदिया जिल्ह्याची विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. कोणताही विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतांना सर्व माध्यमांच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा गायले जावे, त्यानंतर कवायत व प्रसायदान करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी यशोगाथा तयार करुन त्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) फरेंद्र कुतीरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विशाल डोंगरे, प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे राजकुमार हिवारे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांचेसह शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक शिक्षक दिनेशकुमार अंबादे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी यांनी मानले.

