नवीन प्रॉफेसर कॉलनी येथे वरिष्ठ नागरिकांसाठी अंगदान व नेत्रदान जनजागृती
गोंदिया : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी”अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदियाच्या वतीने “अंगदान जीवन संजीवनी” अभियानाची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे.शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था,शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालये व अशासकीय संस्था व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक “अंगदान जीवन संजीवनी”अभियान अंतर्गत अवयवदान शपथ व जनजागृती करित आहे.

केटीएस रुग्णालयाच्या समुपदेशक भाविका बघेले यांनी दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी गोंदिया शहरातील नवीन प्रॉफेसर कॉलनी येथे सकाळी ६.३० वाजता वरिष्ठ नागरिकांसाठी अंगदान व नेत्रदान जनजागृती कार्यक्रम यशस्वी पार पडला.अंगदान आणि नेत्रदान या विषयांवर समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने केटीएस रुग्णालयाचे नेत्रदान सल्लागार भाविका बघेले यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ नागरिक गटासाठी खास जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ नागरिकांच्या गटाला अंगदान व नेत्रदानाची संपूर्ण माहिती देण्यात आली.भाविका बघेले यांनी अंगदानाचे महत्त्व, कोणते अवयव दान करता येतात, नेमकी कोणती प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी, मेंदूमृत (Brain Death) व्यक्तीचे महत्त्व या सर्व गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले.अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमातील माहिती ऐकून भावनिक प्रतिक्रिया दिल्या व कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. काहींनी लगेचच नेत्रदानासाठी आणि अंगदानासाठी संमती फॉर्म भरून नोंदणी केली. भाविका बघेले यांनी याआधीही विविध शाळा,महाविद्यालये,पोलीस स्टेशन, वसाहतींमध्ये असे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत.त्यानी सांगितले की, “अंगदानाची खरी गरज ही समाजात समजून घेतली पाहिजे. लोकांना योग्य माहिती मिळाली तर अनेकांचे जीवन वाचू शकते.” कार्यक्रमाचे संयोजन शांततेत आणि प्रभावी पद्धतीने पार पडण्यासाठी पार्वती वैद्य, पुष्पा पुरी, सुशील कुमार वैद्य (माजी सैनिक), सुनील राठोड, पंकज पलन, राजकुमार गोस्वामी, विजय मेश्राम यांचे सहकार्य लाभले. यामुळे नवीन प्रॉफेसर कॉलनी, कुडवा नाका, गोंदिया. परिसरात समाजहिताचा सकारात्मक संदेश पोहोचला.या कार्यक्रमाचे आयोजन अवयवदान जिल्हा समुपदेशक भाविका बघेले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
……………………….
कार्यक्रमात खालील ठळक मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
अंगदान नंतर अनेक जणांना नवे जीवन मिळू शकते हे विविध उदाहरणांद्वारे सांगण्यात आले.
नेत्रदानाच्या गरजांवर विशेष भर देत, नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते हे विशद करण्यात आले.
अवयवदानाची ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन देण्यात आले.
राष्ट्रीय अंगदान संस्था (NOTTO) च्या अधिकृत वेबसाईटचा वापर कसा करायचा, कोणते तपशील भरावे लागतात, आणि नोंदणी नंतर कोणते कागदपत्र आवश्यक असतात, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.

