LatestNewsगोंदिया- भंडारा

महसूल सेवक संघटना आक्रमक; आजपासून चतुर्थ- श्रेणी दर्जासाठी बेमुदत आंदोलनाचा इशारा

जिल्हा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा :
महसूल विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या महसूल सेवक (कोतवाल) यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी भंडारा जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दि. ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही मागणी मान्य न झाल्यास १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांच्या क्षेत्रातील कोराडी (क्रिडा संकुल) येथे बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात महसूल सेवक (कोतवाल) हे एक महत्त्वाचे घटक आहेत. शासकीय योजनांची अंमलबजावणी, निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, शेतीशी संबंधित योजनांचे समन्वय, तसेच राजशिष्टाचार आणि बिगर महसुली कामे यामध्ये कोतवालांचा मोठा वाटा आहे. गावपातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत शासनाच्या धोरणांचा आणि योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात महसूल सेवक अथक परिश्रम घेतात. तलाठी साझा आणि वरिष्ठ कार्यालयांमध्ये २४ तास शासकीय सेवेत कार्यरत असलेले कोतवाल हे खऱ्याअर्थाने शासन आणि जनता यांच्यातील दुवा आहेत.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महसूल सेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणत्याही सेवा सुविधा मिळत नाहीत. इतर महसूल कर्मचायांना मिळणाऱ्या सुविधांपासून कोतवाल वंचित राहत असून, त्यांच्यावर अन्याय होत आहे निवेदनात म्हटले आहे की, ‘महसूल सेवकहा विभागाचा कणा असूनही, त्यांना शासकीय वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे मान्यता मिळालेली नाही. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन त्यांच्या सेवांचे मूल्यांकन करावे, अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे.
भंडारा जिल्हा महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने शासनाला आवाहन तेले आहे की, महसूल सेवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा प्रदान करावा ‘जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ रोजी मा. महसूल मंत्र्यांना नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महसूल विभाग हा सामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांशी थेट निगडित आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रांचे वितरण, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या कामांमुळे हा विभाग शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करतो. कोतवालांच्या मते, त्यांच्या सेवांचे योग्य मूल्यांकन आणि सुविधा मिळाल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील, ज्याचा थेट फायदा शासन व जनतेला होईल.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *