LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

सालेकसा पोलिसांची धडक कारवाई; पानगावात उघडकीस आली गांजाची शेती, १७६ झाडांसह ११.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

५७ किलोहून अधिक ओला गांजा हस्तगत : ६३ वर्षीय आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

सालेकसा (गोंदिया) :सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पानगाव येथे शेतात छुप्या पद्धतीने करण्यात आलेली गांजाची अवैध शेती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात गांजाची तब्बल १७६ हिरवीगार झाडे जप्त करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या ओल्या झाडांचे एकूण वजन ५७.५८३ किलो असून, बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किंमत ११ लाख ५१ हजार ६६० रुपये आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमदास दादुराम मनघटे (वय ६३, रा. पानगाव, ता. सालेकसा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सविस्तर वृत्त असे की, पानगाव शिवारातील एका शेतात प्रतिबंधित गांजाची झाडे लावून ती वाढविली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी पानगाव येथे छापा टाकला. पोलीस पथकाने धरमदास मनघटे यांच्या ताब्यातील जागेची बारकाईने झडती घेतली असता, तेथे गांजाची झाडे रीतसर लागवड केलेल्या अवस्थेत आढळून आली.१७६ झाडे मुळासकट उपटली; ५७ किलो वजनपोलिसांनी पंचनामा करत शेतातून गांजाची एकूण १७६ झाडे मुळासकट जप्त केली. या सर्व ओल्या गांजाच्या झाडांचे वजन केले असता ते ५७ किलो ५८३ ग्रॅम भरले. २० हजार रुपये प्रति किलो दराने या जप्त मालाचे अधिकृत मूल्यांकन ११ लाख ५१ हजार ६६० रुपये इतके करण्यात आले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार गवई यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी धरमदास मनघटे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात कारवाईसदर यशस्वी कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपूरकर आणि सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी नागोसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार सोन्जाल, तूरकर, लांडगे, पोलीस नाईक कानसकर, निमजे, पोलीस शिपाई वेदक, बैस, गौतम, कटरे व चौहान यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण भागातील अमली पदार्थांच्या या अवैध लागवडीचे धागेदोरे नेमके कुठे जोडलेले आहेत आणि हा गांजा कोणाला विकला जाणार होता, या दृष्टीने गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोठरे करत आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *