तिरोडा तालुक्यात महसूल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
तिरोडा : तिरोडा तालुक्यातील चांदोरी परिसरामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. सविस्तर असे की, फिर्यादी बालकेश्वर देवीलाल पटले (वय ४७ वर्ष, व्यवसाय: ग्राम महसूल अधिकारी, रा. रामनगर, तिरोडा, जि. गोंदिया) या महसूल विभागात कार्यरत आहेत. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७:३० ते ८:२५ दरम्यान मौजा पाटीलटोला परिसरात एसआयआर कामा निमित्ताने मतदारांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे काम करून ते चांदोरी बुज येथे दुष्काळ खरीप हंगाम २०२६-२०२७ ची यादी प्रसिद्धीकरणासाठी चांदोरी येथील ग्रामपंचायत चौकात उभे होते. कोणतीही खातेदार मदतीपासून वंचित राहू नये म्हणून त्या यादीचे वाचन करत असताना, बिरोली नदीघाटाकडून दोन विनाक्रमांक ट्रॅक्टर लाल रंगाचे रेती भरून वेगाने येताना दिसले. फिर्यादीने दोन्ही ट्रॅक्टर चालकांना रॉयल्टी तपासणीसाठी हात दाखवला, मात्र त्यांनी ट्रॅक्टर अधिक वेगाने पळवण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादीने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला असता, आरोपींपैकी एका मोटरसायकल चालकाने ट्रॅक्टर चालकांना “अबे थांबू नका, जोरात जा” अशी सूचना दिली आणि “तुम्ही गाडी थांबवू नका, तुम्ही थांबवणार कोण?” असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धाऊन आला व जिवे मारण्याची धमकी दिली.शासकीय कामात अडथळा निर्माण करून मौल्यवान गौण खनिजाची चोरी करणे, अरेरावी करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारी वरून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. विजय तिरपुडे हे करत आहेत. या घटनेत १२,००० रुपये मूल्याचे दोन ब्रास रेतीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून आरोपी अमोल वसंत उपसे (वय अंदाजे २१ वर्षे, रा. बिरोली, ता. तिरोडा) याच्याविरुद्ध तपास सुरू आहे.

