LatestNewsगोंदिया

दारू ढोसून वर्गातच झोपला शिक्षक, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात?

गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ, त्या शिक्षकाच्या प्रताप चर्चेत
गोंदिया :
पंचायत समिती देवरी अंतर्गत ग्राम मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांनी अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला आहे. आर.एस.बहेकार असे या मद्यपी शिक्षकाचे नाव आहे.
मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक असून २२ विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र सरावलेल्या शिक्षकाने ती वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला. शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर पाय ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने शिक्षक शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले आणि त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. याची तक्रार गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
शिक्षकी पेशाला कलंक…
समाजात शिक्षकाला वेगळं स्थान प्राप्त आहे. शिक्षण हे अनेकांच्या आयुष्यात गुरुस्थानी असतात. शिक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थी आणि पालक भविष्याची स्वप्न रंगवत असतात. मात्र सध्या शिक्षकीपेशाला कलंक लागेल अशा घटना समोर येत आहे. लैंगिक छळ, बलात्कार आणि आता तर चक्क दारु पिऊन वर्गात झोपले असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालक संतापले…
शाळेतील शिक्षकाचा हा प्रताप पाहून पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसतात. त्यात अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिकवणं पालकांसमोर मोठं आव्हान असतं. शिक्षणासाठी गावातील प्राथमिक शाळा हाच एकमेव पर्याय पालकांसमोर असतो. मात्र याच शाळेतील शिक्षकांचे असे प्रताप समोर येत असल्याने पालकदेखील चांगलेच संतापल्याचं बघायला मिळालं.

गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सैरभर भटकत होते.तेच मी व काही गावकरी शाळेत काय प्रकार सुरू आहे करिता, अचानक भेट दिली. तर शाळेतील शिक्षक आर.एस. बहेकार दारू पिऊन खुर्चीवर झोपलेल्या अवस्थेत दिसले. शिक्षण क्षेत्रात मद्यपी शिक्षक असतील तर, विद्यार्थी काय धडे शिकतील. या मद्यपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी व गावकऱ्यांनी मागणी आहे.

– हंसराज वालदे ग्रामपंचायत सदस्य

मी एलआयसी च्या कामानिमित्त साकोली ला गेलो होतो. आणि शाळेची पूर्ण जबाबदारी बहेकार सरांकडे सोपविले होतो. शाळेत दारू पिऊन यायचे नाही असे त्याला कित्येकदा बजावून सांगण्यात आले.

– एन.के.सोनवणे मुख्याध्यापक जि.प. प्राथ.शाळा मोहगाव

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *