LatestNewsगोंदिया

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी महागणेशोत्सव (Mahaganeshotsav) स्तुत्य उपक्रम : जिल्हाधिकारी प्रजित नायर

जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे महागणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
 महागणेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा
गोंदिया :
 लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. या माध्यमातून स्थानिक कलावंतांना आपल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ मिळत असते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी महागणेशोत्सव (Ganeshotsav) हा एक स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जलाराम लॉन, आमगाव रोड, गोंदिया येथे (ता.6) आयोजित महाराष्ट्र राज्य उत्सव महागणेशोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.


 जिल्हाधिकारी श्री. नायर पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. राज्यात आपली संस्कृती आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागांमध्ये साजरा करण्यात येतो. भक्ती व अध्यात्माला सामाजिक बाबीची जोड देणारा हा महोत्सव शासनामार्फत राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, जोपासना व्हावी, संस्कृती वृध्दींगत व्हावी यासाठी गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यात येतो. या माध्यमातून स्थानिक कलावंतांना त्यांच्यात असलेल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळण्यात मदत होते, असे त्यांनी सांगितले.
भामरे म्हणाले, गणेशोत्सव साजरा करणे हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. लोकांच्या धार्मिक भावनेला अनुसरुनच महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास देखील लोकांपर्यंत पोहचविण्याचे शासनाचे धोरण आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या गणेशोत्सवातून अधोरेखित करण्याकरीता आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी या माध्यमातून कलावंतांना व्यासपीठ मिळण्याची संधी उपलब्ध होत असते. या निमित्ताने समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी होत असतात. गणेश उत्सव दरम्यान नागरिकांनी कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व महागणेशोत्सव (Ganeshotsav) पर्व शांतता व आनंदाने साजरा करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 यावेळी सत्य साई सेवा मंडळ गोंदिया द्वारे वीण विनाशक गणनाथा… गजाननारे गननाथा, जगदेश्वरी दया करो माँ… शिवशंकरी कृपा करो माँ, मजोरे मेबुवा साई राजगोपाला, जय गणराया… श्री गणराया मंगलमुर्ती मोरया आदी भजन सादर करण्यात आले.  गुरुदेव सेवा मंडळ गोंदिया द्वारे आओ गजानंद आओ… आके भक्तो का मान बढाओ, आओ गजानंद प्यारे… गिरजा के दुल्हारे, मुक मे हरि है… मन मे हरी है, डमडम बाजे रे बरवा आदी भजन सादर करण्यात आले. त्यानंतर नरखेडा नृत्य समुह कलावंतांद्वारे गणेश वंदना सादर करण्यात आली. नंतर स्वच्छतेकडून समृध्दीकडे यावर गणेश स्मरण सादर करण्यात आले. असर फाऊंडेशनच्या कलावंतांद्वारे वासुदेव आला यावर लोक संगीत सादर करण्यात आले. लावण्य कटरे या मुलीने राधा गोरी-गोरी… बरसाने छोरी या गाण्यावर नृत्य सादर केले. अदासी येथील मुलींनी गोंडीनृत्य सादर केले. नरखेडा नृत्य समुह कलावंतांद्वारे गवळण सादर करण्यात आली. धनश्री पारधी या मुलीने एकल नृत्य सादर केले. अंबाबाईचा उधव-उधव हे गोंधळ सादर करण्यात आले. असर फाऊंडेशनच्या कलावंतांद्वारे जय महाराष्ट्र माझा, आई जगदंबेचा जोगवा, विठ्ठलाच्या वारीला चला सादर करण्यात आले. डॉ.अजयकुमार शर्मा यांनी जानता राजा शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर केले. पुनम पाटील यांनी वाट पाहते मी गं, येणार साजन माझा ही लावणी सादर केली. त्यानंतर मुलींनी गोंडीनृत्य सादर केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी महाराष्ट्राचा राज्य उत्सव महागणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती विशद केली.  याप्रसंगी मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जि.प.चे माहिती व शिक्षण तज्ञ अतुल गजभिये, नैसर्गिक आपत्ती कार्यालयाचे संजय लाडे यांनी अथक परिश्रम घेतले.    कार्यक्रमास नायब तहसिलदार प्रकाश तिवारी, सहाय्यक अधीक्षक देवेंद्र पोरचेट्टीवार, सहाय्यक माहिती अधिकारी कैलाश गजभिये, समाजसेविका रोहिणी रहांगडाले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले, तर उपस्थिताचे आभार तहसिलदार समशेर पठाण यांनी मानले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *