आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट
व मेट्रो सफारीचा लुटला आनंद
गोंदिया : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथील उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांना सुप्त कला-गुणांना वाव देण्यासाठी दि.18 मे 2026 रोजी नागपूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आश्रमशाळेतील 230 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर अभ्यास दौऱ्यामध्ये झिरो माईल्स ते खापरी दरम्यान मेट्रोने विद्यार्थ्यांनी प्रवास केला. मेट्रोने प्रथमत:च प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. या आनंदामध्ये काही विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्यावर डान्स करुन आनंद साजरा केला तर काही विद्यार्थ्यांनी ड्रामाच्या माध्यमातून राणी दुर्गावती यांचे सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी धावत्या मेट्रोमध्ये क्रांतीसुर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे रांगोळीच्या स्वरुपात चित्र साकारले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मेट्रोमध्ये मातीच्या कलाकृती, गोंडी चित्रे, बांबूपासून साहित्य तयार केले व उपस्थित अधिकारी यांचेसमोर तयार केलेल्या साहित्याचे सादरीकरण केले.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने उपायुक्त विकास राचेलवार, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नागपूर मयुरी शिंदे व प्रकल्प अधिकारी देवरी उमेश काशिद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.सायली चिखलीकर, तसेच अधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षक व कर्मचारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेटून संवाद साधला. यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देण्यात आली. या भेटीमध्ये पोलीस आयुक्त नागपूर डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांचेकडून विविध शस्त्रांबाबत माहिती देण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्था संदर्भात विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करुन पोलीस विभागातील विविध पदाच्या नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देवून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच आयपीएस (IPS) अधिकारी होण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रेरित असे मार्गदर्शन केले. यानंतर आश्रम शाळेतील 230 विद्यार्थ्यांना शहरी भागातील आधुनिक सोयी-सुविधांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने नागपूर येथील ‘व्हीआर मॉल’ (VR Mall) येथे एका विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मॉलमध्ये मांडण्यात आलेल्या विविध वस्तूंची प्रदर्शने पाहिली, तसेच ‘गेम टाईम झोन’मधील विविध खेळांचा आनंद घेतला.
याप्रसंगी राज्यसभा खासदार मायाताई इवनाते आणि परिणय फुके यांच्या सुविद्य पत्नी डॉ.परिनिता फुके यांनी सदर ठिकाणी भेट देवून विद्यार्थ्यांसोबत गेम खेळणे, त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी, विद्यार्थ्यांचे एकपात्री नाट्य प्रयोग, तसेच उन्हाळी शिबिरातील विविध उपक्रमांचा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेली ‘गोंडी चित्रे’ आणि बांबूपासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू मान्यवरांसमोर सादर केल्या व त्यांना भेट वस्तू म्हणून दिल्या. तद्नंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आईसक्रिमचा आस्वाद घेत संवाद साधला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमवेत आईस्क्रीमचा आस्वाद घेत, या आनंददायी व माहितीपूर्ण भेटीची सांगता केली.

