HealthLatestNewsगोंदियाविदर्भ

किटकजन्य आजार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा : मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम 

गोंदिया :   जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने पावसाचे पाणी सर्वत्र साचलेले दिसत आहे.त्यामुळे डासोत्पती स्थानकांची वाढ होण्याची शक्यता बघता राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात किटकजन्य आजार जसे हिवताप,डेंग्यू, चिकनगुनिया,चंडीपुरा,जे.ई.व हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत वाढते रुग्णांची शक्यता बघता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना पत्र लिहुन प्रतिबंधात्मक उपाययोजना गावपातळीवर राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
राज्यात गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित केलेला आहे.गोंदिया जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असतात.त्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.
हिवताप रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे बनले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांनी सांगितले आहे. 15 व्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीना विविध अनुदान प्राप्त होत असते.गावपातळीवर हिवतापाचा प्रादुर्भाव ही प्रमुख समस्या निर्माण झालेली आहे.ती गावातच सोडवावी जेणे करुन त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढणार नाही. हिवताप आजार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीनी गावपातळीवर वेळीच खबरदारी उपायोजना केल्यास हिवताप आजाराला झिरो करण्यास शक्य असल्याचे एम.मुरुगानथंम यांनी या दिवसाबाबत आव्हान केलेले आहे.
कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन एम.मुरुगानथंम यांनी या दिवसाबाबत केलेले आहे. मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी डासांपासून मानवांमध्ये संक्रमण आणि मानवांकडून डासांमध्ये संक्रमण यापैकी कोणताही एक घटक खूप कमी झाला तर त्या भागातून मलेरियाचे उच्चाटन होऊ शकेल त्यामुळेच हिवताप जोखीमग्रस्त भागात रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांसोबतच डासांचे निर्मूलन किंवा चावण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.  डासांच्या उत्पत्तीची ठिकाणी नष्ट करून हिवताप आजारावर बरेच नियंत्रण मिळवता येते. साचलेला पाण्यात डासांची पैदास होते, अशा साचलेल्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी, वाळवावी किंवा निचरा करावा किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तेल टाकावे जेणेकरून डासांच्या अळ्या श्वास घेऊ शकत नाही.

एक दिवस कोरडा डिवस पाळा
 साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात.यामध्येही मोठ्या प्रमाणात हिवताप व डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून येतात. त्यामुळे पिंप व पाणी साठवण्याची इतर भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाण्याचे पिंप वा इतर भांडी पूर्णपणे उलटे करून ठेवावीत.त्यानंतर काही वेळाने ती कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. पुसत असताना ती दाब देऊन पुसावीत. त्यामुळे पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *