बाल विवाहाला आळा घालण्यासाठी जिल्हयात 100 दिवसाचे अभियान
गोंदिया : बाल विवाह मुक्त भारताचे ध्येय पुर्ण करण्यासाठी सर्व राज्यांना आणि केंद्र शासीत प्रदेशांना 100 दिवसांची मोहिम राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार 14 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत या कालावधीत ही मोहिम राबविली जात आहे. सदर कालावधीत शाळा, महाविद्यालय, गावस्तरावर, शहरी भागात वार्डस्तरावर तसेच ज्या-ज्या ठिकाणी लोकांचा समुह असेल तिथे बालविवाह बाबत जागरुकता निर्माण करणे, विविध ठिकाणी चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रतिज्ञा घेणे, समारंभ आयोजित करणे, सुचना फलक लावणे, पोस्टर लावणे, जेणेकरुन नागरिकांचा बालविवाहा सारख्या अनिष्ट प्रथेवर लक्ष केंद्रित होईल. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा बाल संरक्षण समितीतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गोंदिया जिल्हयात विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या अभियानातील 100 दिवसाच्या कालावधीत बालविवाह हा प्रामुख्याने विषय घेऊन ग्रामपंचायत स्तरावर आणि वार्डस्तरावर सभा घेण्यात याव्यात. बालविवाह मुक्त गोंदिया जिल्हा निर्माण करण्यासाठी या मोहिमेचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. या मोहिमेमुळे बालविवाह संदर्भात नागरिकांच्या मानसिकतेत बदल होण्याचा विश्वास जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केला आहे. बालबिवाह ही अनिष्ट प्रथा असून ती समाजात खोलवर रुजलेली आहे. बालविवाहामुळे बालकांच्या आरोग्यावर व त्यांच्या विकासावर खुप मोठा परिणाम होतो. देशाच्या विकासाकरीता सुदृढ नागरिक तयार करण्यासाठी, त्यांच्या अधिकाराचा उल्लंघन होणार नाही याबाबत जनतेमध्ये बालकांसंबंधित कायदयाची जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन या अभियानात सहभागी व्हावे आणि बालविवाहमुक्त गोंदिया जिल्हा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे तसेच लग्न पत्रिका छपाई करणारे प्रिंटिंग प्रेस चालक, मंडळ डेकोरेशन चालक, फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालय/लॉन, सभागृह व्यवस्थापक, बॅन्ड वादक, कॅटरींग चालक, विविध धर्मातील लावण्यात येणारे श्रध्दास्थाने व इतर सामुहिक विवाह ट्रस्ट यांनी बालविवाह होणार नाही याची खातरजमा करावी. तसेच आपल्या गावात, शेजारी, नातेवाईकात बालविवाह होत असल्यास महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले आहे. बाल विवाह संदर्भात माहिती देणाऱ्यांचे नाव, पत्ता गोपनीय ठेवण्यात येईल.
इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया ही बाल हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात काम करीत आहे. 27 नोव्हेंबर रोजी “बालविवाह मुक्त भारत” मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीने शाळा, ग्रामीण समुदाय आणि इतर संस्थांमध्ये सदर संस्थेने बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींबद्दल जनतेला जागरुक केले आणि स्पष्ट केले की, कायद्यानुसार लग्नातील पाहुणे, केटरर्स, तंबू मालक, बँड सदस्य, सजावट करणारे किंवा बालविवाह करणारे पुजारी यांच्यासह कोणत्याही प्रकारे बालविवाहात सहभागी असलेल्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या कोणालाही या गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची दखल घेण्यात यावी.

