LatestNewsगोंदियाविदर्भ

tiger attack : मानव-प्राणी संघर्ष पेटला; झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

ब्लॅकेट, मच्छरदाणीसह ओढत नेत पाडला फडसा
धमदीटोला येथील घटना : परिसरात भितीचे वातावरण
गोंदिया (देवरी) :
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानव-प्राणी संघर्ष पेटला आहे. काही दिवसापूर्वी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर (बंगाली कॅम्प) परिसरात एका ५ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने ठार केले. या घटनेची शाई सुकली नाही तोच आज, २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पुन्हा देवरी तालुक्यातील धमदीटोला येथे झोपेत असलेल्या एका महिलेवर वाघाने हल्लाबोल (tiger attack ) करून तिचा फडसा पाडला. चक्क ब्लॅकेट, मच्छरदाणीसह ओढत नेवून तिच्या शरीराचे लचके तोडले. ही घटना उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाबाई शंकर कोराम (वय ४९) रा. आलेवाडा ता. देवरी असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सविस्तर असे की, आलेवाडा येथील प्रभाबाई शंकर कोराम ही महिला मुलीकडे धमदीटोला येथे आली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाबाई कोराम ही मागील एक महिन्यापासून मुलीच्या बाळंतपणा करिता पाहुणी म्हणून धमदीटोला येथे आली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना, काल रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. अंदाजे १:०० वाजे दरम्यान, प्रभाबाई ही खाटेवर झोपली होती. ही रात्र तिची शेवटची ठरली. झोपेत असताना वाघाने प्रभाबाईवर हल्ला (tiger attack ) करीत तिला फरफटत नेऊन ठार केले. सदर बाब घरातील सदस्यांना सकाळी माहिती होताच, आरडाओरड केल्याने घटनास्थळी गावकरी जमा झाले. घटनेची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन अधिकारी तसेच पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली. अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मानव-प्राणी संघर्ष पेटला आहे. वन्यप्राण्यांचे सतत हल्ले वाढले असून जीवहानीला समोर जावे लागत आहे. काही दिवसापूर्वी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर (बंगाली कॅम्प) परिसरात एका ५ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने ठार केले होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
………………….
घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असूनही, वनविभाग कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्यामुळे, गावकरी संतप्त झाले आहेत. गावकर्‍यांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. ही घटना कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मृतकाच्या कुटुंबाला वेळीच मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
…………………..
महिलेला ब्लॅकेट व मच्छरदाणीसह नेले फरफटत
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात (tiger attack ) प्राण गमावलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून, अर्जुनी/मोर. तालुक्यातील संजयनगर येथील बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार झाल्याची घटना ताजी असताना, धमदीटोला येथे मृतक महिला साखर झोपेत असतानाच मध्यरात्री वाघांनी हल्ला चढवला चक्क मच्छरदाणी आणि अंगावर ओढलेल्या ब्लँकेटसह मृतक महिलेला ओढत नेऊन शरीराचे लचके तोडले. कुटुंबीयांनी सकाळी हा प्रसंग बघताच आरडाओरड सुरू केला. वन्य प्राण्यांचे मानवी हल्ले थांबण्याचे चिन्ह सध्या तरी दिसून येत नाही अशा घटनांमध्ये दिवसागणित वाढच होत आहे. वाघाने महिलेला ठार करून तिचे शिर वेगळे केले. या घटनेची वार्ता वार्‍यासारखी पसरली असून जमलेल्या लोकांचा संताप अनावर झाला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *