Gondia: ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ मोहिमेत सहभागी व्हा!
मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम यांचे आवाहन : आठ ते पंधरा ऑगस्ट पर्यंत मोहिम
गोंदिया : देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळाले. हा राष्ट्रीय अभिमान जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येत आहे. तिरंग्याचा सन्मान करतांना ‘हर घर स्वच्छता’ राबविण्याची गरज असून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीसह प्रत्येक व्यक्तीने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त हे अभियान राबविण्यात येत आहे. आज (ता.8) पासून या मोहिमेला सुरवात करण्यात आली असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राविण्यात येणार असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी कळविले आहे.

हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता ही मोहिमेची संकल्पना लोकसहभागातून उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्याचा सार स्वच्छता व सुजलता या संकल्पनेशी जोडली गेली आहे. पंतप्रधानाची संकल्पना बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात, स्वच्छ पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चीत करण्यासाठी पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा 8 ऑगस्टला शुभारंभ करण्यात आला असून सुजल गाव प्रतिज्ञा नागरीक व शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, जलकुंभ, पाणी आणि स्वच्छता सुविधांची स्वच्छता करणे. गावातील विद्यार्थी, युवक यांची स्वच्छता रॅली, वैयक्तीक घरगुती स्तरावर रांगोळी काढणे व स्वच्छता घटकांना रंगकाम करणे, नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याची गळती शोधणे, व थांबविणे, सार्वजनिक शौचालय, धनकचरा व्यवस्थापन केंद्र, प्लास्टीक व्यवस्थापन केंद्र परिसरासह इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविणे,प्लास्टीक कचरा संकलन मोहिम राबवून त्याच्या व्यवस्थापनाशी संबधित तपासणी करणे, सार्वजनिक स्वच्छता ‘आझादी का श्रमदान’ सार्वजनिक ठिकाणासह रस्त्यांवर साफसफाई करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट हा पायाभूत सुविधा स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पायाभूत सुविधाची स्वच्छता व सुशोभिकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. देशभक्तीपर थीमसह पाणी आणि स्वच्छता स्थळांचे रंगकाम आणि सजावट करणे व पायाभूत घटकांवर तिरंगी धागे बांधणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने कळविले आहे. 13 ऑगस्ट रोजी स्वच्छता संवाद आणि जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून कचरा व्यवस्थापन तांत्रिक प्रात्यक्षिक व शौचालय देखभाल, जलसंवर्धन, भूजल पूर्नभरण, जलस्रोत संरक्षण, एकल वापराचे प्लास्टीक टाळणे, इत्यांदीबाबत जनजागृती करणे ग्रामस्थांद्वारे वैयक्तीक शौचालय स्वच्छता उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची तयारी यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाण, रस्ते, चौक, बाजारपेठा, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य स्थळांची अंतिम स्वच्छता व सजावट आणि ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चीत करून साफसफाई करणे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी कळवून या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हावासीयांनी सहभाग घेण्याचे आवाहनही केले आहे.

