दाम्पत्य जीवनात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीचा पत्नीने काढला काटा
१३ लाखांची सुपारी देऊन घडवून आणली हत्या
गोंदियातील वर्षा तुरकर हत्याकांडाचा उलगडा
जीपीएस (GPS) ट्रॅकिंगद्वारे पाठलाग करून विवाहितेचा खून!
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडरानी गावाच्या जंगलात घडलेल्या वर्षा तुरकर हत्याकांडाचा छडा लावण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पतीच्या प्रेमसंबंधामुळे त्रस्त झालेल्या पत्नीनेच शेजाऱ्याच्या मदतीने कुख्यात गुन्हेगाराला १३ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, पतीच्या कारमधील जीपीएस (GPS) लोकेशन मोबाइल ॲपद्वारे ट्रॅक करून मारेकऱ्यांनी जंगलात गाठत वर्षा तुरकर हिचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नीसह चौघांना अटक केली असून, दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील नितेश अग्रवाल याचे मृतक वर्षा तुरकर हिच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रकारामुळे नितेशची पत्नी सौ. मोना नितेश अग्रवाल (वय ४१, रा. साई मंगलम लॉनसमोर, गोविंदपूर रोड, गोंदिया) ही प्रचंड त्रस्त होती. तिने वर्षाचा काटा काढण्यासाठी घराशेजारी राहणारा कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१, रा. साई मंदिर जवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया) याची मदत घेतली. कुणालने गोंदियातील कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय ३३, रा. सिंधी कॉलनी, गोंदिया) याच्याशी संपर्क साधून १३ लाख रुपयांत वर्षा तुरकर हिला जिवे मारण्याची सुपारी दिली.
शाहरुख पठाण याने या खुनाची जबाबदारी संजयनगर मुरी (जि. गोंदिया) येथील इमरान करीम शेख (वय २६), नलेन ऊर्फ नायलान शेख (वय २४) आणि क्रिश राऊत (वय १९) या तिघांवर सोपवली.
‘टोयोटा आय-कनेक्ट’ ॲपद्वारे केले कारचे लोकेशन ट्रॅक
नितेश अग्रवाल वापरत असलेली कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. या कारमध्ये जीपीएस यंत्रणा बसविलेली होती. नितेश हा बालाघाट येथे गेल्यानंतर मृतक वर्षा हिला भेटणार असल्याची कुणकूण लागताच, पत्नी मोना हिने कारच्या जीपीएस प्रणालीचा (‘Toyota i-Connect’ ॲपचा) आयडी आणि पासवर्ड आरोपींच्या मोबाइलमध्ये टाकून ॲप ॲक्टिव्हेट करून दिले.
त्यानंतर तिन्ही मारेकऱ्यांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग सुरू केला. जीपीएसद्वारे मिळालेल्या अचूक लोकेशनच्या आधारे आरोपींनी बोंडरानी गावाच्या जंगलातील शिवमंदिराजवळ गाठले आणि वर्षा तुरकर हिच्या पोटावर व पाठीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे.
चौघांना बेड्या; दोघे फरार
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून या गुन्ह्यातील आरोपी इमरान करीम शेख, शाहरुख खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि सौ. मोना नितेश अग्रवाल या चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी दवनीवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुन्ह्यातील इतर दोन आरोपी नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलची कौतुकास्पद कामगिरी
सदर गुन्ह्याचा उलगडा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजू मिश्रा, पोहवा इंद्रजित बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सुजित हलमारे, नापोशि शैलेश निनावे, पोशि राकेश इंदुरकर, हंसराज भांडारकर, सुनील उईके, करण बारेवार, निखिल मेश्राम, छगन विठ्ठले, मपोशि स्मिता तोंडरे, चापोशि राम खंडारे, विलेश ठाकरे, इमरान सय्यद, मुरली पांडे तसेच सायबर सेलचे पोशि रोशन येरणे व आकिब काझी यांच्या पथकाने केली.

