कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या सीआरपीएफ जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
उमरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; २० वर्षांपासून अखंड देशसेवा
साकोली (भंडारा): दिवाळीच्या सुट्ट्या कुटुंबासोबत घालवून पुन्हा मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्यावर निघालेल्या एका वीर सुपुत्रावर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित विजापूर येथे कार्यरत असलेले सीआरपीएफ जवान श्रीधर गोपाल कापगते (वय ४७, रा. उमरी लवारी, ता. साकोली) यांचे प्रवासादरम्यान तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी त्यांच्या मूळ गावी उमरी येथील स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात व बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे उमरीसह संपूर्ण साकोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
देशसेवेच्या ओढीने वाढवला होता १० वर्षांचा सेवाकाळ:
श्रीधर कापगते हे २० वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) भरती झाले होते. त्यांच्या सेवेचा नियमित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही केवळ देशसेवेच्या पवित्र ओढीने त्यांनी आपला सेवा करार (बॉण्ड) पुढील १० वर्षांसाठी वाढवून घेतला होता. सध्या ते छत्तीसगडमधील विजापूर येथे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत होते. दिवाळीनिमित्त सुट्टी मिळाल्याने ते आपल्या पत्नीसह स्वगावी उमरी लवारी येथे आले होते.
सुट्ट्या संपवून शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी ते आपल्या पत्नीसोबत कारने पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी विजापूरकडे निघाले होते. प्रवासादरम्यान आरमोरी (जि. गडचिरोली) जवळ आल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. पत्नीने प्रसंगावधान राखत त्यांना तात्काळ आरमोरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात अखेरचा निरोप:
या दुःखद घटनेची माहिती तातडीने सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर जवान श्रीधर कापगते यांचे पार्थिव त्यांच्या उमरी या स्वगावी आणण्यात आले. गावातील लाडक्या सुपुत्राचे पार्थिव दारात येताच कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. शनिवारी सकाळी ११ वाजता उमरी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. सीआरपीएफच्या विशेष तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून आपल्या सहकाऱ्याला मानवंदना दिली.
याप्रसंगी आमदार नाना पटोले, आमदार अविनाश ब्राह्मणकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कापगते, गावचे सरपंच, उपसरपंच तसेच परिसरातील हजारो नागरिक व ग्रामस्थ साश्रूनयनांनी उपस्थित होते.

