मैत्रीला काळिमा! क्षुल्लक वादातून मित्रानेच केला मित्राचा चाकूने सपासप वार करून खून
वर्ध्यातील इतवारा परिसरातील थरार
वर्धा: दोन जीवाभावाच्या मित्रांमध्ये झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान थेट रक्तरंजित खेळात झाल्याची धक्कादायक घटना वर्धा शहरातील इतवारा परिसरात घडली आहे. केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अवधूत फुलझेल (वय ३५, रा. फ्रुटमंडी, इतवारा) आणि आरोपी रवी गोविंद गंगावणे (वय ४२, रा. इतवारा) हे दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र होते. १८ मे रोजी रात्री ११:५० वाजताच्या सुमारास हे दोघेही इतवारा परिसरातील नवदुर्गा माता मंदिराजवळ बसून गप्पा मारत होते. गप्पा मारत असतानाच अचानक अवधूत याने रवीला विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “मला शिवीगाळ का करतोस?” यावरून दोघांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक वादाचे रूपांतर पाहता पाहता मोठ्या हाणामारीत झाले. हा राग अनावर झाल्याने आरोपी रवी गंगावणे याने आपल्या जवळील तीक्ष्ण चाकू काढला आणि अवधूतवर एकामागून एक सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवधूतचा जागीच मृत्यू झाला. भरवस्तीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने चक्र फिरवली. १९ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास आरोपी रवी गंगावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. नागेश फुलझोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. आरोपीला १९ मे रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष ताले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर, इम्रान खिल्लची, थेमसिंग कोहचडे आणि विजय खाडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

